‘माझी लाडकी बहिण’ योजनेच्या केवायसीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत ऐतिहासिक मुदतवाढ
जळगाव जिल्हा प्रतिनिधी बशीर तडवी,
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत केवायसी (KYC) प्रक्रियेसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा विरावली (ता. यावल) येथील सामाजिक कार्यकर्त्या यशश्री देवकांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण, ठाम आणि समाजाभिमुख पाठपुराव्याचे ठोस फलित मानले जात आहे. त्यांनी शासनाकडे ई-मेल तसेच लेखी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून सविस्तर निवेदन सादर करत महिलांच्या अडचणी प्रभावीपणे मांडल्या होत्या.
राज्यभरातून केवायसी मुदतवाढीबाबत होत असलेल्या मागण्यांची गंभीर दखल घेत शासनाने हा महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. यामुळे आतापर्यंत विविध कारणांमुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या हजारो पात्र महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यशश्री पाटील यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते की, राज्यातील अनेक पात्र महिलांची केवायसी प्रक्रिया प्रशासकीय व तांत्रिक अडचणींमुळे अपूर्ण राहिली आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील महिला, विधवा, परित्यक्ता, अल्पशिक्षित तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार लिंकिंगची अडचण, बँक खात्यातील नावातील तफावत, पॅन कार्ड नसणे, विवाहानंतर नाव बदल, जन्मदाखल्यावर बारकोड अथवा डिजिटल स्वाक्षरीचा अभाव अशा विविध कारणांमुळे केवायसी पूर्ण करणे अशक्य झाले होते.
या गंभीर प्रश्नांसंदर्भात त्यांनी अर्थ विभाग, महिला व बालविकास विभाग तसेच मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ जाहीर केली असून, महिला व बालविकास विभागाने जिल्हा व तालुका स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करून केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
या निर्णयामुळे महिला सक्षमीकरणाच्या शासनाच्या धोरणाला अधिक बळ मिळाले असून, राज्यातील हजारो महिलांना योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यशश्री देवकांत पाटील यांच्या मागणीला मिळालेले हे यश समाजाभिमुख कार्याचे आणि संवेदनशील नेतृत्वाचे उत्तम उदाहरण ठरत आहे, अशी प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
दरम्यान, ज्या महिला अद्याप कोणत्याही कारणास्तव योजनेपासून वंचित राहिल्या आहेत, त्यांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी आवश्यक कागदपत्रांसह केवायसी प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशश्री देवकांत पाटील यांनी केले आहे. शासनाने दिलेल्या या अतिरिक्त संधीचा लाभ घेऊन कोणतीही पात्र महिला योजनेपासून वंचित राहू नये, हीच आपल्या पाठपुराव्याची खरी पूर्तता ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

