12 ऑगस्ट हा रॅगिंग विरोधी दिन म्हणून ओळखला जातो. यावर्षी 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट हा रॅगिंग विरोधी आठवडा म्हणून जाहीर करण्यात आला होता. या अनुषंगाने यावल तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी, या उद्देशाने तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून आलेल्या सूचनेप्रमाणे यावल तालुका विधी सेवा समिती च्या वतीने फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये रॅगिंग या विषयावर जनजागृती शिबिर घेण्यात आले.
यावल तालुका विधी सेवा समिती चे अध्यक्ष आर.एस.जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. समाजामध्ये सुसंस्कृत लोकांसह काही विकृत मानसिकता असलेले लोकही वावरत असतात. महाविद्यालय हे सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्याचे केंद्र मानले जाते. काही विद्यार्थ्यांमध्ये घृणा, द्वेष,ईर्षा, तिरस्काराची भावना भरलेली असते. यामुळे इतर विद्यार्थ्यां सोबत वाईट कृत्य करण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते. त्यातूनच जन्माला येते ते रॅगिंग नावाचं भूत. काही विद्यार्थी एखाद्या विद्यार्थ्यांचा किंवा काही विद्यार्थ्यांचा लिहून, बोलून किंवा कृतीद्वारे शाब्दिक, शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक छळ करत असतात. विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण व्हावी त्या उद्देशाने त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना लाज आणणारे, अपमानित करणारे, भीती निर्माण करणारे कृत्य करण्यास भाग पाडतात. परिणामी मुलांमध्ये हिनभावना निर्माण होते, विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता असते. तर कधी कधी अशा घटनांमुळे ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाल्याचे पाहण्यात येते. अशा घटना घडू नये म्हणून यूजीसी मार्फत अँटी रॅगिंग कमिटी स्थापन करण्यात आलेली असते. विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेताना अँटी रॅगिंग एफिडेविट भरून द्यावे लागते. अशा घटना ज्या विद्यार्थ्यांसोबत होतात त्यांच्यासहित अशा घटना घडवून आणणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण होते. असे होऊ नये म्हणून यावल तालुका विधी सेवा समिती द्वारे हे शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शशिकांत वारूळकर हे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.हरीश नेमाडे हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ताराचंद सावसाखळे यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्राचार्य डॉ.आर बी वाघुळदे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी,समांतर विधी सहाय्यक हेमंत फेगडे, अजय बडे तसेच धनाजी नाना महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट


